जळगाव । जळगाव येथील कारागृहात भुसावळ येथील माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात यांच्या हत्याकांडातील आरोपीची अंतर्गत वादातून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
भुसावळचे माजी नगरसेवक तथा रिपाइंचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र बाबूराव खरात (वय ५५) यांची ७ ऑक्टोबर २०१९ रोजी एका टोळक्याने त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर केलेल्या भयंकर हल्ल्यात रवींद्र खरात यांच्यासह एकूण पाच जणांची हत्या केली होती. या प्रकरणातील संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून ते जळगाव कारागृहात आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी मोहसीन असगर खान (वय ३४) याचे दुसरा संशयित आरोपी याच्याशी काल दुपारी भांडण झाले. दुपारपासूनच या दोघांमध्ये धुसफुस सुरू होती. या अनुषंगाने रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास दुसर्या संशयित आरोपीने याने मोहसीन असगर खान ( वय ३४) याच्यावर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले. असगरला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला मृत घोषीत करण्यात आले.
जेलमधील कैद्याचा थेट खून झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कर्तव्यात कसूर करणार्यांवर कारवाई होण्याचे संकेत आहेत. पोलीसांनी जेलकडे धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे. या माध्यमातून भुसावळातील गँगवार हे जेलमध्ये देखील पोहचल्याचे दिसून आले आहे.















Discussion about this post