मुक्ताईनगर । जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण वाढताना दिसत असून अशातच सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी पाच हजारांची लाच मागून स्वीकारताना मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा तलाठ्यासह दोन खाजगी पंटरांना जळगाव एसीबीकडून अटक करण्यात आली. बुधवार, 8 रोजी दुपारी झालेल्या या कारवाईने जिल्ह्यातील लाचखोर पुरते हादरले आहेत.
अटकेतील आरोपींमध्ये काकोडा तलाठी प्रशांत प्रल्हाद ढमाळे (42, रा.चिखली रानखांब, ता.मलकापूर, ह.मु.गणपती नगर, भाग, 5 मलकापूर) तसेच खाजगी पंटर अरुण शालीग्राम भोलानकार (32, कुर्हा, ता.मुक्ताईनगर)व संतोष प्रकाश उबरकर (25 कुर्हा, ता.मुक्ताईनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
जळगावातील 30 वर्षीय तक्रारदार यांचे आजोबा यांचे नावे कुर्हा, ता. मुक्ताईनगर येथे शेत गट क्र.167/18 आहे. तक्रारदार यांचे आजोबा 1997 मध्ये मयत झाले असून तेव्हापासून तक्रारदार यांचे वडील, काका, आत्या व मयत काकांच्या मुलांचे यांचे 7/12 उतार्यावर नाव लावणे बाकी होते. त्यासाठी तक्रारदार यांनी 1 जानेवारी रोजी कुर्हा तलाठी यांची भेट घेतली असता त्यांनी प्रत्येक वर्षाचे 220 रुपये या प्रमाणे 6000 रुपये शासकीय फी भरावी लागेल, असे सांगितले व शासकीय फी भरायची नसेल तर मला पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवून पडताळणी करण्यात आली.
लाच स्वीकारताच तिघांना बेड्या
लाचेची रक्कम अरुण भोलानकर यांच्या सांगण्यावरून संतोष उबरकरने स्वीकारताच आधी दोघांना व नंतर तलाठ्याला अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
Discussion about this post