बुलढाणा : क्षुल्लक कारणातून जुना वाद उफाळून युवकांचे दोन गट आमनेसामने आले. यावेळी दोन गटाच्या हाणामारीत चाकूने हल्ला करण्यात आल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील २१ वर्षीय युवकाची हत्या झाल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील धुपेश्वर येथे घडली. तर या घटनेत दुसरा गंभीर जखमी झाला. याप्रकरणात पोलिसांनी लागलीच कारवाई करत काही जणांना ताब्यात घेतले.
या घटनेबाबत असे की, जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात असलेल्या पिंप्राळा येथील सतीश गजानन झाल्टे आणि अविनाश जितेंद्र झाल्टे या दोघांचा काही दिवसांपूर्वी मलकापूर येथील काही युवकांशी फाट्यावर वाद झाला होता. दरम्यान हे दोघे दर्शनासाठी मलकापूर तालुक्यातील धोपेश्वर मंदिरात आले असता मलकापूर येथील युवक त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी जुने भांडण उकरून काढत तरुणांनी दोघांशी वाद घालण्यास सुरुवात केली.
जुन्या वादातून पुन्हा दोन्ही गटात वाद निर्माण होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत येऊन पोहचले होते. दरम्यान मलकापूर येथील तरुणांच्या गटाने पिंप्राळा येथील दोघांवर चाकूने हल्ला केला. या चाकू हल्ल्यात दोघे ही जमिनीवर पडले असता त्यातील सतीश झाल्टे या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अविनाश झाल्टे हा गंभीर जखमी असून त्याच्या सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटना घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी धाव घेत चाकूने वार करणाऱ्या मलकापूर येथील आरोपी युवकांना चांगलाच चोप दिला. यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तर याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.















Discussion about this post