मुंबई । आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी विविध योजना आणल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिण योजनेतील पात्र महिलांना आता वर्षाला ३ सिलिंडर मोफत मिळणार आहे. केंद्र सरकारच्या उज्जवला योजनेतील लाभार्थी महिला आणि लाडकी बहिण योजनेतील महिलांना हे सिलिंडर मोफत मिळणार आहे. यासाठी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमुळे केंद्र सरकारच्या उज्जवला योजनेतील तब्बल ५२ लाख १६ हजार महिलांना लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहे.
काय आहेत अटी?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी घरातील गॅस सिलिंडरची जोडणी महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे. एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल. १४.२ किलोग्रॅम वजनाच्या सिलिंडरची जोडणी असणारे ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
उज्ज्वला योजनेप्रमाणेच ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ असेल. या योजनेत महिलांना वर्षाला ३ सिलेंडर मोफत मिळणार आहे. या गॅस सिलिंडरचे वितरण तेल कंपन्यांतर्फे करण्यात येईल. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून ३०० रुपये अनुदान मिळते. याचसोबत राज्य शासन गॅस सिलिंडरची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करते. याचाच अर्थ लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना ८३० रुपये मिळणार आहे.
केंद्र सरकारने १ मे २०१६ साली ‘उज्ज्वला योजना’ राबवली होती. या योजनेत गरीब महिलांना मोफत सिलेंडर देण्यात येत आहे. गरीब महिलांना चुल्हीवर जेवण बनवण्यापासून सुटका मिळावी, यासाठी ही योजना राबवण्यात आली होती. त्यानंतर आता राज्यसरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवली आहे. ज्यात महिलांना वर्षाला ३ मोफत सिलिंडर मिळणार आहे.