मुंबई । अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी भारतीय हवामान विभागाकडून दिलासा देणारी घोषणा करण्यात आली आहे. मान्सूननं केवळ दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याची माहिती पुणे वेधशाळेकडून देण्यात आली आहे.
मान्सूनच्या आगमनामुळे खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून महाराष्ट्रात उशीराने दाखल झाला होता. त्यातच मान्सूनला बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. मान्सून तळ कोकण आणि गोव्यात दाखल झाल्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळ आलं. त्यामुळे मान्सूनची गती मंदावली.
मात्र आता मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं असून, मान्सूनने अवघ्या 24 तासांत 400-500 किलोमीटरचं अंतर पार केलं आहे. मान्सूननं केवळ दोन दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र व्यापलं आहे.
तसेच गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मिरचा काही भाग सोडता संपूर्ण देशात मान्सून सक्रिय झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. सध्या राज्याच्या काही भागात पाऊस कोसळत आहे. अद्याप काही ठिकाणी पपावसाची प्रतिक्षा कायम आहे.
Discussion about this post