पुणे । उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे भारतात यंदा मान्सून लवकरच धडकणार असून १३ मे रोजी मॉन्सूनने अंदमान आणि निकोबार बेटांवर प्रवेश केला आहे.बंगालच्या उपसागरात आणि अंदमान समुद्राच्या दक्षिण भागात मॉन्सून सक्रिय झाला आहे. २७ मे पर्यंत मॉन्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल. १ जून ते ५ जूनपर्यंत मॉन्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. १० जूनपर्यंत मॉन्सून महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात मॉन्सून कधी धडकणार ?
यंदा दक्षिण-पश्चिम मॉन्सून सामान्यपेक्षा लवकर भारतात दाखल होईल. १३ मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर मॉन्सूनने प्रवेश केला आहे. केरळमध्ये २७ मेपर्यंत, गोव्यात १ जूनपर्यंत, तर मुंबईत ५ जूनपर्यंत मॉन्सून पोहचण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात 10 जूनपर्यंत मॉनसून दाखल होईल. ही शेतकरी आणि उष्णतेपासून दिलासा मिळवणाऱ्यांसाठी आनंददायी बातमी आहे. केरळमधील मॉनसूनचा प्रारंभ देशात मॉनसूनच्या आगमनाचा अधिकृत संकेत आहे.
महाराष्ट्रात यंदा मे महिन्याच्या मध्यात हवामानात मोठा बदल दिसून आला. भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा दिला आहे. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे, पालघरसह इतर २९ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट आणि मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचीही शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे, विशेषतः उन्हाळी पिकांना धोका आहे.
Discussion about this post