भारतातील खासगी हवामान संस्था ‘स्कायमेट’ने चांगली बातमी दिली आहे. यंदाचा मान्सून पाऊस कसा असेल याचा अंदाज जाहीर केला आहे. यावर्षी सामान्य मान्सून राहील, असा अंदाज स्कायमेटने वर्तवलाय
जून-सप्टेंबरच्या कालावधीत ८६८.६ मिमी पाऊस होईल. या काळात सरासरी (LPA) १०३ टक्के हंगामी पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने (IMD) अद्याप या वर्षीच्या मान्सूनचा अंदाज जाहीर केलेला नाही.
यावर्षी सामान्य मान्सून राहणार असून यंदा सरासरी ९६ टक्के ते १०४ टक्के पाऊस होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवलाय. एजन्सीनुसार,देशाच्या फक्त २०टक्के भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरित ८० टक्के भागात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार पश्चिम आणि दक्षिण भारतात अनुकूल पाऊस पडेल. यात केरळ, कर्नाटक किनारी आणि गोवा यासह पश्चिम घाटात जास्त पाऊस पडेल.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही मुख्य मान्सून क्षेत्रातही पुरेसा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ईशान्येकडील प्रदेश आणि उत्तर भारतातील डोंगराळ राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवलीय. स्कायमेटच्या मासिक अंदाजानुसार, जूनमध्ये ९६ टक्के, जुलैमध्ये १०२ टक्के, ऑगस्टमध्ये १०८ टक्के आणि सप्टेंबरमध्ये १०४ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कमकुवत ला निना
उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील थंडपणा चांगल्या मान्सूनसाठी पोषक आहे. यंदा ‘अल निनो’चा परिणाम जाणवणार नाही. दुसरीकडे सरासरी इतके पर्जन्यमान असेल. ला निना आणि ईएनएसओ-न्यूट्रल एकत्रितपणे मान्सूनला गंभीर परिणामांपासून वाचवतील,” असं स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंग म्हणालेत.
Discussion about this post