जळगाव – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) जळगाव येथे महानगरपालिकेच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या कचरा संकलन केंद्रामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थी, शिक्षक व स्थानिक नागरिकांना गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव शाखेतर्फे महानगरपालिकेला निवेदन देऊन सदर केंद्र तात्काळ व कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
केंद्रात उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने माशा, डास, उंदीर आणि इतर रोगकारक कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा मूलभूत स्वच्छ वातावरणाचा हक्क बाधित होत असून सार्वजनिक आरोग्य अधिनियम 1949 व पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे उल्लंघन होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. शिवाय, हे केंद्र मुख्य रस्त्यालगत असल्याने शहराच्या सौंदर्यावरही परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
यापूर्वी मौखिक व लेखी तक्रारी करूनही ठोस कारवाई न झाल्याने मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. १ सप्टेंबरपासून स्वच्छतेचे काम नव्या एजन्सीकडे सोपविण्यात येत असून, त्या एजन्सीला देखील कचरा केंद्र कायमस्वरूपी बंद ठेवण्याबाबत लेखी सूचना देण्याची मागणी करण्यात आली आहे. सदरचे केंद्र तात्काळ व कायमस्वरूपी बंद न केल्यास कायदेशीर कारवाई व उग्र आंदोलन उभारण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष किरण तळले, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगळे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक रज्जाक सय्यद, शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक अविनाश पाटील, संदीप मांडोळे, ॲड. सागर शिंपी, भूषण ठाकूर, महिला सेनेच्या अनिता कापुरे, लक्ष्मी मोरे, लताबाई तायडे, नजमा तडवी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.















Discussion about this post