जळगाव – शहरातील अतिक्रमण कारवाईत होत असलेल्या कथित भेदभावाच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली असून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जळगाव महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देत प्रशासनाला जाब विचारला आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, खोटे नगर ते कालिका माता मंदिर या प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, विशेषतः परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून रस्त्यावर विविध साहित्याची विक्री सुरू आहे. मात्र, अतिक्रमण विभागाकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शहरात अतिक्रमण हटविण्याची कारवाई करताना स्थानिक छोट्या व्यावसायिकांवर कारवाई केली जाते, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने भेदभाव होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे, असे मनसेने म्हटले आहे.
दरम्यान, मनसेने प्रशासनाकडे हॉकर्स झोन निश्चित करून रस्त्यावरील विक्रेत्यांना नियमानुसार जागा उपलब्ध करून द्यावी, अशी ठोस मागणी केली आहे. तसेच अतिक्रमणाबाबत सर्वांसाठी समान नियम लागू करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.















Discussion about this post