मुंबई :समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून राज्याच्या विकासाची समृद्धी होईल अशी अपेक्षा असताना, सध्या या महामार्गावर पोलिसांचीच समृद्धी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अडवून, त्यांच्याकडून वसुली केली जात असल्याचा आरोप करत असून पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या वसुलीचा एक व्हिडीओ आ. दानवे यांनी ट्वीट केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती महामार्ग पोलिस अधीक्षक अनिता जमादार यांनी माध्यमांना दिली आहे.
समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळेल अशी वल्गना सरकारची होती. पण रोजगार असलेल्या लोकांना अशी 'समृद्धी' येईल, हे नव्हतं सरकारने सांगितलं. गतिमान महाराष्ट्र कसा? तो असा!#samruddhi #expressway #समृद्धी@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @DGPMaharashtra pic.twitter.com/iIsSQeUxbQ
— Ambadas Danve (@iambadasdanve) May 31, 2023
समृद्धी महामार्गावर सद्या मोठ्याप्रमाणावर जड वाहतूक सुरु आहे. मात्र काही महामार्ग पोलिसांकडून या गाड्यांना अडवून त्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एवढच नाही तर गाडी सोडण्यासाठी पैश्यांची मागणी देखील केली जाते. गेल्या अनेक दिवसांपासून हे चित्र सुरु आहे. त्यातच आता या वसुलीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामुळे पोलिसांची ही वसुली थांबवण्याची मागणी केली जात आहे.
काय आहे व्हिडीओत ?
अंबादास दानवे यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओत एक पोलिस एका वाहनचालकाकडून काही तरी घेऊन खिशात घालत असल्याचे दिसत आहे. तसेच, दुसऱ्या ठिकाणी दोन पोलिस असेच करत असल्याचे दिसून आले. मोठ्या वाहनांचे चालक किंवा क्लीनर यांना खाली उतरवून त्यांच्याकडून काहीतरी घेऊन ते खिशात घातल्याचेही यात दिसत आहे. जवळपाच चार ते पाच जणांना रोखून अशी कृती पोलिस करीत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. पोलिसांचीच समृद्धी होत असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.