वाशीम । राज्यात महिला-मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबत नाहीय. अशातच भावाबहिणीच्या नात्याला काळीमा फसणारी खळबळजनक घटना वाशीम जिल्ह्यातून समोर आली आहे.
ज्यामध्ये आतेभावानेच नात्यातील अल्पवयीन 15 वर्षीय बहिणीचे बळजबरीने शारीरिक शोषण केले, ज्यामध्ये मुलगी 8 महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. या प्रकाराची कुठेही वाच्यता केल्यास तुझ्या भावाला जीवे मारून टाकीन, अशी धमकी आरोपीने पीडित मुलीला दिली होती. त्यामुळेच तरुणीने भीतीपोटी घडलेला प्रकार कुणाला सांगितला नाही; मात्र, हा धक्कादायक प्रकार कुटुंबात उघडकीस आल्यांनतर याप्रकरणी दाखल तक्रारीवरून कारंजा शहर पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी ही तिचा 18 वर्षीय भाऊ, वडील आणि आजीसोबत राहते. तिचा 23 वर्षीय आतेभाऊ हा मानोरा तालुक्यातील गलमगावचा रहिवासी आहे. तो कामानिमित्त 29 मार्च 2023 पासून कारंजातच राहत होता. पीडित मुलीच्या काकासोबत तो हमालीचे काम करायचा आणि रात्रीच्या वेळी पीडितेच्या घरीच झोपायचा. अशात एकेदिवशी त्याने रात्रीच्या वेळी घरातील सर्वजण झोपेत असताना पीडितेवर शारीरिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पीडित मुलीसोबत सतत लैंगिक शोषण होत राहिले. मात्र याबाबत कुणाकडेही वाच्यता केल्यास तुझ्या भावाला जीवे मारून टाकीन, अशी धमकी आरोपीने मुलीला दिली. कालांतराने या प्रकारात पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचे तिच्या लक्षात आले आणि ही बाब तिने आरोपीला सांगितली असता त्याने प्रकरणातून हात झटकण्यास सुरुवात केली. मुलगी आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे ऐकताच आई-वडिलांना जबर धक्का बसला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ कारंजा शहर पोलीस स्टेशन गाठत आरोपी विरोधात रितसर तक्रार दाखल केली.
याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. या गंभीर प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात भादंविचे कलम 376, 376(1) (एन), 376(3) सहकलम पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रियंका वासनिक करत आहेत.
Discussion about this post