जळगाव । पाचोरा येथे आयोजित शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी विकासकामांसाठी निधी मिळत नसल्यावरुन तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या तक्रारींचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी समर्थन करत आणि राजकीय परिस्थितीवर मिश्किल टोलेबाजी करत आपली भूमिका स्पष्ट केली.
किशोर पाटील यांचा राग योग्य असून भाजपने माझ्या मतदारसंघात चांगले काम केले, पण आमदार किशोर पाटील यांच्या मतदारसंघात काम केले नाही, हे मी मान्य करतो. माझ्यावर पण एकदा अन्याय झाला होता. मी तर मोदी साहेबांच्या सभेत गोंधळ घातला होता. पाच वर्ष मेहनत करून ऐनवेळी कुणी गोंधळ घालत असेल, तर प्रत्येक माणसाच्या करिअरचा विषय असतो. किशोर पाटलांच्या सांगण्यात एक तडतड आणि कळकळ आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले
यावेळी गुलाबराव पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र लढण्याच्या आमदार किशोर पाटील यांच्या भूमिकेवर थेट भाष्य करणे टाळले. परंतु पाचोरा-भडगाव मधील परिस्थिती पक्ष नेतृत्वापर्यंत निश्चित पोहोचवेन. मला खात्री आहे की ते काही तोडगा काढतील. परंतु या ठिकाणी आता तोडगा काढण्याच्या पलीकडे स्थिती झाली आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
किशोर पाटलांच्या विरोधात कितीही लोक एकत्र आले तरी, त्यांनी कामे केली आहेत. त्यामुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघात त्यांना घवघवीत यश मिळेल, असा विश्वासही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला















Discussion about this post