नंदुरबार : रेशन दुकानात गोरगरिबांना धान्याचा लाभ दिला जात असतो. मात्र याच रेशन दुकानांमधून आता पैसे मिळणार आहे. रेशन दुकानावर मिनी बँक चालवणारा नंदुरबार जिल्हा हा राज्यातील नव्हे तर देशात पहिला जिल्हा ठरणार आहे. गावांतील रेशन दुकानदारांनी मिनी बँकच्या माध्यमातून बँकिंग सुविधा पुरवण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले.
रेशन धान्य वाटप करण्यासाठी गावागावांमध्ये सरकारने ऑनलाईन पॉस मशीन उपलब्ध करून दिले आहे. यामुळे लाभार्थ्यांना बोटाचे ठसे घेऊन नोंदणी करत धान्य दिले जाते. आता याच पॉस मशीनच्या माध्यमातून मिनी बँक सुविधा नंदुरबार जिल्ह्यात सुरु केली जात आहे.
नंदुरबार जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात प्रयोग राबविला जात असून रेशन दुकानावर मिनी बँक चालवणारा नंदुरबार जिल्हा हा पहिला जिल्हा ठरणार आहे. आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यातील बँकांची कमतरता आणि बँकांबाहेर होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांवर मिनी बँक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. जिल्ह्यातील ९०० पैकी ८३० गावांमध्ये ऑनलाईन पॉस मशीनच्या माध्यमातून धान्य वितरण सुरू आहे. आता याच गावांतील रेशन दुकानदारांनी मिनी बँकच्या माध्यमातून बँकिंग सुविधा पुरवण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले.
Discussion about this post