मुंबई : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर येऊज ठेपली असून यातच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मिलिंद देवरा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. देवरा यांच्या पक्षपदाच्या राजीनाम्यामुळे आजच ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
दक्षिण मुंबई मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीत काहीशी धुसफूस असल्याचं दिसून येत आहे. ठाकरे गटाकडून वारंवार दक्षिण मुंबई मतदारसंघावर दावा सांगण्यात आल्यापासूनच काँग्रेस नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. अशातच याच नाराजीतून काँग्रेस नेते मिलिंद देवरा काँग्रेसची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत काँग्रेसला मोठं खिंडार पडणार आहे. मुंबईतील 10 माजी नगरसेवक, 25 पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा आजच शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. माजी खासदार मिलींद देवरा यांचा दुपारी 2 वाजता वर्षा बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिलिंद देवरा नाराज? काँग्रेसची साथ सोडणार
भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधक एकवटले आहेत, पण तेच आता एकमेकांविरोधात उभे ठाकतात की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला कारण ठरतंय ते लोकसभेचं जागावाटप. मुंबईतील मतदारसंघांवर काँग्रेस आणि शिवसेनेकडून दावा केला जात आहे. याच दाव्यांवरुन आघाडीत बिघाडी होते की काय अशी चर्चा रंगू लागली आहे.
Discussion about this post