मुंबई । राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने धुमाकूळ घेतला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, अनेकांच्या घरात पुराचं पाणी शिरल्यामुळे संसार वाहून गेला. लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली आल्यानं बळीराजावर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे. मात्र यातच आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. पुणे वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील काही दिवस पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे.
उत्तर ओडिशा आणि बाजूच्या प्रदेशावर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे तसेच हे क्षेत्र उत्तरेकडे सरकले आहे. यामुळे महाराष्ट्रातील पाऊस कमी झाल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका हा कोकण आणि विदर्भाला बसला आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 17 टक्के अधिक पाऊस झाला आहे. मात्र जरी असं असलं तरी पावसाचं प्रमाण असमान आहे. कोकण, गोव्यात सरासरीच्या 36 टक्के अधिक पाऊस झाला आहे, तर मध्य महाराष्ट्रात सरासरी इतका पाऊस झाला आहे. दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात सरासरीच्या 15 टक्के जास्त पाऊस झाला आहे. तर अहमदनगर, सांगली, सातारा, जालना, अमरावती या जिल्ह्यांना अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे.
Discussion about this post