जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
जळगाव । जिल्ह्यातील एलपीजी गॅस सिलेंडर तसेच पेट्रोल-डिझेल इंधनाचा साठा आणि त्याचे सुरळीत वितरण सुनिश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना मोरे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी उमा खापरे, सर्व गॅस एजन्सी धारक, पेट्रोल पंप डीलर्स, तेल कंपन्यांचे विक्री अधिकारी तसेच संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील एलपीजी गॅस सिलेंडरच्या उपलब्ध साठ्याची सद्यस्थिती तपासण्यात आली. भविष्यातील मागणी लक्षात घेऊन पुरवठ्याचे सुयोग्य नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाने निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसारच गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले. तसेच केटरर्स, हॉटेल व्यावसायिक व एमआयडीसीतील उद्योजकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर सकारात्मक मार्ग काढण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
यावेळी पेट्रोल व डिझेलच्या साठा व वितरणाचाही आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा व नियमित साठा उपलब्ध असून इंधन पुरवठा साखळी सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले की, समाजमाध्यमांवर पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये. जिल्ह्यात इंधनाचा किंवा गॅसचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी घाबरून न जाता दैनंदिन गरजेनुसारच खरेदी करावी. अनावश्यक गर्दी किंवा जादा साठा करून ठेवण्याचे टाळावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांना गॅस व इंधन साठा आणि वितरणावर सतत लक्ष ठेवण्याचे तसेच कोणत्याही तांत्रिक किंवा वितरणातील अडचणी तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात गॅस व इंधनाचा पुरवठा विनाव्यत्यय आणि पारदर्शक पद्धतीने सुरू ठेवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचेही या बैठकित सांगण्यात आले.














Discussion about this post