नवी दिल्ली । राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरणाने अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे १ एप्रिलपासून देशभरात औषधांचे दर वाढणार आहे. याचा कोट्यवधी रुग्णांच्या खिशाला त्याचा फटका बसणार आहे.
दरवर्षी NPPA ही संस्था आवश्यक औषधांच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या दरांचे पुनरावलोकन करते. यंदा महागाईचा दर लक्षात घेता औषधांच्या किमती वाढवण्यास परवानगी देण्यात आली आहे. १.७ टक्क्यांपर्यंत औषधांच्या दरात वाढ होणार असून ती थेट रुग्णांच्या दैनंदिन खर्चावर परिणाम करणार आहे.(
कर्करोग, मधुमेह, हृदयरोगावरही खर्च वाढणार :
ही दरवाढ राष्ट्रीय आवश्यक औषध यादीतील (NLEM) औषधांवर लागू होणार आहे. यामध्ये अँटिबायोटिक्स, वेदनाशामक, मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब आणि कर्करोगावर वापरल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या औषधांचा समावेश आहे. अनेक नागरिक हे औषधं रोजच्या रोज घेत असल्याने या दरवाढीचा थेट परिणाम त्यांच्यावर होणार आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, किंमत नियंत्रणामुळे देशभरात दरवर्षी सुमारे ३,७८८ कोटी रुपयांची बचत होते. पण यावेळी याच यादीतील औषधं महाग होणार असल्याने रुग्णांवरील आर्थिक ताण वाढणार आहे. औषध कंपन्यांनी उत्पादन खर्चात वाढ झाल्याचे कारण देत ही मागणी केली होती, ज्याला सरकारने यंदा मान्यता दिली आहे.
NPPA ने स्पष्ट केलं आहे की, महागाई आधारित मूल्य पुनरावलोकन (Inflation-based Price Revision) मुळे ही वाढ झाली आहे. घाऊक मूल्य निर्देशांक (WPI) वाढल्याने औषध कंपन्यांना किंमती वाढवण्याचा अधिकार देण्यात आला. औषध उद्योगातील कंपन्यांना महागाईचा फटका बसत असताना, त्यांना थोडा दिलासा मिळाल्याचं सांगण्यात येतंय.
मात्र याचा मोठा फटका सामान्य रुग्णांना बसणार आहे. नियमित औषधं घेणाऱ्या वृद्ध, मधुमेही, हृदयरोगी आणि कर्करोगग्रस्त रुग्णांना त्यांच्या औषधांच्या वाढीव दराचा सामना करावा लागणार आहे. ही दरवाढ पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार आहे.
Discussion about this post