कटरा : माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आता भक्तांना देवीचे दर्शन घेण्यासाठी काही नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. जम्मू-काश्मीरमधील कटरा येथील वैष्णोदेवी मंदिरात पूजा आणि दर्शनासाठी काही ड्रेस कोड लागू करण्यात आले आहेत. माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने देवीच्या भक्तांना सभ्य कपडे परिधान करून मातेच्या दरबारात येण्याचा सल्ला दिला आहे. मंदिर प्रशासनाने ड्रेस कोडबाबत अधिसूचना जारी केली आहे.
माता वैष्णो देवी मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांना सभ्य कपडे घालावे लागतील, असे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे. महिलांना साडी नेसण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तुम्हाला चड्डी, बरमुडा, टी-शर्ट, नाईट सूट इत्यादी लहान कपडे परिधान करून मंदिराच्या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. असे कपडे परिधान करून येणाऱ्यांना दर्शन आणि आरतीमध्ये सहभागी होता येणार नाही. या ड्रेस कोडची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल.
वास्तविक, ड्रेस कोडशी संबंधित हा नियम जुना आहे, परंतु मंदिर प्रशासन आता तो अनिवार्य करत आहे. मंदिराचे पावित्र्य आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे. श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड प्रशासन आपल्या जुन्या सूचनांवर नवरात्रीपासून कडक कारवाई करणार आहे. जनजागृतीसाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आले असून, ड्रेस कोडबाबत घोषणाही केल्या जात आहेत.
आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात
आजपासून म्हणजेच १५ ऑक्टोबर २०२३ पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. 24 ऑक्टोबर 2023 पर्यंत चालेल. नवरात्रीच्या 9 दिवसात दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या काळात काही लोक पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात, तर काही लोक संपूर्ण 9 दिवस उपवास करतात. यावेळी श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने नवरात्रभर उपवास करणाऱ्या भाविकांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. सर्व यात्रा मार्गांवर भाविकांना लंगरमध्ये मोफत फळे दिली जातील. ही सुविधा तारकोट साइट, सांझी छत परिसर आणि भैरव मंदिर परिसरामध्ये असेल.
Discussion about this post