अमळनेर । शेतकरी मोठं कष्ठाने पीक पिकवीत असतो. मात्र अनेकवेळा त्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नसते. त्यात व्यापाऱ्याकडून होणाऱ्या फसवणुकीमुळे मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागते. अशातच शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करताना वजनात मोठी तफावत आढळल्याने अमळनेर तालुक्यातील मंगरूळच्या आर. के. फूड्स कंपनीवर कृषी उत्पन्न बाजार समितीने कारवाई करून कंपनीला सील ठोकले आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट पसरली आहे.
याबाबत असे की, तालुक्यातील सोनखेडी येथील दीपक देविदास पाटील यांचा ५०–५५ क्विंटल गहू भरणे अपेक्षित असताना तो फक्त ४१ क्विंटल दाखवला गेला, तर गंगापुरी येथील रवींद्र विठ्ठल पाटील यांचा गहूही प्रत्यक्ष वजनापेक्षा कमी नोंदवला गेला. वजनाची तफावत शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी धुळे रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन केले. बराच वेळ वाहतूक खोळबंल्यानंतर बाजार समिती सभापती अशोक पाटील, संचालक शरद पाटील, वृषभ पारख, प्रकाश वाणी, सचिव डॉ.उन्मेष राठोड, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेडकॉन्स्टेबल काशिनाथ पाटील व इतर घटनस्थळी पोहचले.
वाहतूक सुरळीत केल्यानंतर सर्वांसमक्ष बाजार समिती सभापती व कर्मचाऱ्यांनी आर.के. फूडच्या कंपनीच्या काट्यावर वजन मोजले असता २०० क्विंटल वजन फक्त ९० क्विंटल भरले आणि १०० क्विंटलचे वजन ४० क्विंटल भरले. मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याने उपस्थितांनी प्रचंड संताप व्यक्त करत नाराजी व्यक्त केली. हे प्रकरण वांधा कमिटी समोर ठेवण्यात येईल. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि आतापर्यंत किती लोकांची फसवणूक झाली याचीही चौकशी केली जाईल. कायदेशीर कारवाई केली जाईल. अशी माहिती बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी दिली.















Discussion about this post