धुळे । अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई करत धुळे स्थानिक गुन्हे शाखेने आतापर्यंतची सर्वात मोठी धाड टाकली आहे. शहरातील पवन नगर आणि मोहाडी परिसरात मध्यरात्री छापेमारी करून पोलिसांनी तब्बल 1 कोटी 42 लाख 65 हजार रुपयांचा 570 किलोहून अधिक गांजा जप्त केला. या कारवाईमुळे ड्रग्ज माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून एका 24 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना शहरात मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार तीन स्वतंत्र पथके तयार करून मध्यरात्री संशयित आरोपी विश्वजित ज्ञानेश्वर चौगुले याच्या पवन नगर येथील घरावर छापा टाकण्यात आला.
छाप्यात घरात लपवून ठेवलेला 440 किलो गांजा आढळून आला. पुढील चौकशीत आरोपीने मोहाडी येथील आपल्या आजीच्या घरातही गांजा लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तेथेही धाड टाकून 129 किलो गांजा जप्त केला. अशाप्रकारे एकूण 570.61 किलो गांजा आणि इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून हा अमली पदार्थ कुठून आणला गेला आणि त्यामागील संपूर्ण जाळे कोणते आहे, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.















Discussion about this post