मुंबई । राज्य सरकारने अलीकडे एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे जो राज्यातील शिक्षण प्रणालीला नवीन दिशा देणार आहे. या निर्णयानुसार, राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे शिक्षण अनिवार्य करण्यात येणार आहे.याबाबतची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाबद्दल काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यात त्यांनी शिक्षण विभागाची पुढील वाटचाल कशी असेल, त्यासाठी काय करावे लागेल याबद्दल विविध घटकांची चर्चा करत असल्याचे सांगितले आहे. शालेय शिक्षण विभागाचा रोडमॅप लवकरच तयार केला जाईल, असेही ते म्हणाले.
शाळेतील शिक्षकांनाही मराठी भाषेचे ज्ञान असायलाच हवे
त्यातच आता दादा भुसे यांनी मराठी शिकवणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे. “केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य आहे. यातून त्यांना कोणतीही पळवाट काढता येणार नाही. याबरोबरच मराठी भाषेच्या अध्यापनाला अधिकाधिक व्यापक करण्यासाठी त्या शाळेतील शिक्षकांनाही मराठी भाषेचे ज्ञान असायलाच हवे”, अशी सूचना दादा भुसे यांनी दिली आहे.
“इंग्रजी भाषा आवश्यक असली तरी राज्यात मराठी भाषा महत्त्वाची आहे. आता या भाषेला केंद्राकडून अभिजात ही दर्जा मिळाला आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक आहे. मात्र तरी काही शाळा यातून पळवाट काढत आहेत. अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसल्याच्या तक्रारीही येत आहेत. आता राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचा कायदा करण्यात आला आहे. यामुळे खासगी, सीबीएससी, आयसीएससी किंवा कोणत्याही इंग्रजी बोर्डाच्या शाळांना हा नियम लागू असणार आहे. त्यानुसार मराठी भाषा शिकवली गेलीच पाहिजे”, अशा सूचना दादा भुसे यांनी केल्या आहेत.
Discussion about this post