पुणे । राज्यात मान्सूनचा वेग मंदावला असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मौसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी दोन तीन दिवस लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सूनचा वेग मंदावला असला तरी सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, या सरींचा देखील जोर कमी झाला आहे. खान्देश आणि पूर्व विदर्भातील मान्सूनच्या पावसाची प्रतिक्षा आहे.
दुसरीकडे पावसाने उघडीप दिल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. कमाल तापमान सरासरी तीन ते चार अंशांनी वाढून ३५ ते ४० अंश सेल्सिअसवर गेले आहे. काही ठिकाणी तापमानवाढीमुळे हवेतील बाष्पाचे ढगांत रूपांतर होत आहे. त्यामुळे मेघगर्जना, वादळी वारे वाहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.
दरम्यान, येत्या ४८ तासांत राज्यातील काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील तीन-चार दिवसांत अरबी समुद्रातील र्नैऋत्य मोसमी पावसाची शाखा आणखी मजबूत होईल. त्यामुळे २० जूननंतर मोसमी पाऊस पुन्हा जोर धरेल. तसेच देशाच्या उर्वरित भागात मान्सून दाखल होईल.
Discussion about this post