भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे दिग्गज बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे शुक्रवारी (4 एप्रिल) सकाळी निधन झाले. वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालंय. त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच देशभरात शोककळा पसरली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, हिंदी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. मनोज कुमार यांना 1992 मध्ये पद्मश्री आणि 2015 मधे दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. मनोज कुमार यांचा राजा खोसला यांचा 1964 मधला मिस्ट्री थ्रिलर असलेला ‘वो कौन थी?’ सुपरहिट ठरला. या चित्रपटातील ‘लग जा गले’ आणि ‘नैना बरसे रिमझिम’ ही गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. ही दोन्ही गाजलेली गाणी लता मंगेशकर यांनी गायली होती.
मनोज कुमार यांचा अल्पपरिचय
मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असे होते. चित्रपटसृष्टीच्या प्रेमासाठी त्यांनी आपल्या नावात बदल केला होता. पण त्यांना खरी ओळख ‘भारत कुमार’ या नावाने मिळाली. मनोज कुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी एबटाबाद (आता पाकिस्तानमध्ये) या ठिकाणी झाला. हरिकिशन गिरी गोस्वामी यांचे कुटुंब फाळणीनंतर भारतात आले आणि दिल्लीत स्थायिक झाले. मनोज कुमार यांनी फाळणीचे दुःख जवळून अनुभवले होते.
लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. अशोक कुमार, दिलीप कुमार आणि कामिनी कौशल यांच्या चित्रपटांमुळे ते खूप प्रभावित झाले. यामुळे त्यांनी आपले हरिकिशन हे नाव बदलत मनोज कुमार असे केले.
मनोज कुमार यांनी कॉलेजच्या काळात अनेक नाटकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतर ते मुंबईत आले. १९५७ मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. १९६० मध्ये ‘कांच की गुड़िया’ या चित्रपटात ते पहिल्यांदा मुख्य भूमिकेत दिसले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर ‘उपकार’, ‘पत्थर के सनम’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘संन्यासी’ आणि ‘क्रांती’ यांसारख्या अनेक चित्रपटात ते झळकले. त्यांच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांचे नाव ‘भारत’ असे असायचे. याच कारणामुळे चाहत्यांमध्ये ते ‘भारत कुमार’ म्हणून लोकप्रिय झाले.
Discussion about this post