मुंबई । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याविरोधात भूमिका स्पष्ट केली आहे.९६ कुळी आणि कुणबी मराठा वेगळा आहे. कुठलाच मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही. मीही आयुष्यभर कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही”, असं ते म्हणाले होते. आता त्यांच्या या विधानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी चोख प्रत्युत्तर दिल आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “कुणबी प्रमाणपत्र घ्यायला अडचण काय आहे? आपण आपल्या आजोबा-पंजोबांच्या रक्ताचे आहोत की नाही? आपला आजोबा- पंजोबा अडाणी होता बिचारा. आता आपण सुशिक्षित झालो, त्यानेच आपल्याला शिकवलं. रात्रंदिवस काबाड कष्ट केले, आपल्याला सुशिक्षित केलं. तो आपला आजोबा, पंजाबो, खापरपंजोबा स्वतःला कुणबी समजायचे. एखादा कोणाकडे मुलगी बघयाला गेले आणि कोणी विचारलं की तुमचा मुलगा काय करतो तर ते म्हणायचे आमचा मुलगा एकटा पंधरा एकर कुणबी करतो.”
“पण नंतर कुणबीला सुधारित शब्द आला शेती. आपला आजा चपलेला पायताण म्हणायचा, पण आता पायताणाला चप्पल म्हणतात मग पायताण घालायची बंद करायची का? पूर्वी हॉटेलला हॉटेल म्हणायचे, आता नवीन शब्द आला रेस्टॉरंट, मग चहा प्यायचा बंद करायचा का? पूर्वी घराला वाडा म्हणायचे आता हाऊस म्हणतात मग झोपायचं बंद करायचं का? सुधारित शब्दाला अडचण काय? तुम्हाला घ्यायचं (कुणबी प्रमाणपत्र) तर घ्या नाहीतर घेऊ नका असं ते म्हणाले.
Discussion about this post