बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्राचा दौरा करणाऱ्या मनोज जरांगे यांची बीडच्या अंबेजोगाईच्या सभेत प्रकृती खालावली होती. अंबेजोगाई येथील थोरात मल्टी स्पेशालिटीमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून तब्येत खालावल्याने तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे सतत वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा करतांना पाहायला दिसत आहे. सोमवारी सुरवातीला धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील माकणी-करजगाव येथील सभेत त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांनी बसूनच भाषण केले. पुढे बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील सभेत देखील त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी येथे देखील बसूनच भाषण केले.
त्यानंतर त्यांना तत्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांना ताप असून, प्रचंड अशक्तपणा निर्माण झाला असल्याचे म्हटले. तसेच, त्यांनी विश्रांती घेणं महत्वाचे असल्याचे डॉक्टरांनी म्हटले होते. परंतु, मनोज जरांगे आजच्या नियोजित सभांना उपस्थित राहण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली आहे.
Discussion about this post