मुंबई । मराठा आरक्षणसाठी गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश मिळालं आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारने मान्य करत याबाबतच अध्यादेश देखील काढला. यांनतर जरांगे पाटील यांनी मुंबईमधील आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या बैठकीनंतर त्यांनी कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची मोठी घोषणा केली आहे
काय म्हणाले जरांगे पाटील?
“जोपर्यंत काल काढलेल्या अध्यादेशाची कायदेशीर अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आपल्याला सावध राहावं लागेल. त्यामुळे हे आंदोलन सुरूच राहणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच शेवटच्या मराठ्याला आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत मी इथून उठणार नाही. एकाही मराठ्याला आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळाले की आंदोलनाचे काय करायचे ते ठरवु,” असे जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
त्याचप्रमाणे सगे सोयऱ्यांनाही नोंदी मिळाल्यास प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढला आहे, त्याची सरकारने अंमलबजावणी करावी, नोंद मिळालेल्या सगेसोयऱ्याला ओबीसी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. त्यानंतर खरा गुलाल उधळु, विजय साजरा करु असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी यावेळी रायगडावर (Raigad Fort) जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेणार असल्याचेही सांगितले आहे. २९ जानेवारीला जरांगे पाटील हे रायगडावर जाणार असून ३० जानेवारीला छत्रपती शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेऊन माघारी घरी येईन, असे त्यांनी म्हटले आहे.
Discussion about this post