मुंबई । मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत घोषणा केली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून विधानसभा निवडणूक लढवण्यावर जरांगे यांच्याकडून चर्चा केली जात होती.
काही दिवसापूर्वीच त्यांनी कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार, याची माहिती दिली होती. तसेच कोणत्या जागेवरील उमेदवार पाडण्याचे काम करायचे याबाबतही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर जरांगे यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी एकाही जागेवर उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकाच जातीवर कसं लढणार, एकाच जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढायची नाही. मराठा समाजाच्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत. एकानेही अर्ज कायम ठेवू नये, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
याला पाड, त्याला पाड म्हणायची इच्छा नाही. आपलं कुणीच नाही. पण मला खवळलं तर बघू… दोन्ही शहाणे नाहीत. तुम्ही कुणालाही पाडा आणि कुणालाही निवडून आणा, असे मनोज जरांगे म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलेय. मनोज जरांगे यांनी माघार घेतानाच मराठा समाजला मोठा मेसेजही दिला. त्याशिवाय याला माघार म्हणता येणार नाही, हा गणिमी कावा आहे, असे म्हणाले.