मुंबई । राज्य सरकारने मंगळवारी (२० फेब्रुवारी) विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मनोज जरांगे सगेसोयरे आणि ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत.यावर अंमलबजावणी झाली नाही तर २४ फेब्रुवारीपासून संपूर्ण राज्यात पुन्हा मराठा आंदोलन तिव्र करण्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे. तशा सूचना देखील मराठा कार्यकर्त्यांना केल्या आहेत.
24 फेब्रुवारीला राज्यभरात रास्ता रोको करा असं ते अंतरवाली सराटी येथे संबोधित करताना म्हणाले आहेत. सकाळी 10.30 वाजता आंदोलन सुरु करण्यास त्यांनी सांगितलं आहे. “राज्यातील प्रत्येक गावात रास्ता रोको करा. सकाळी 10.30 वाजता आंदोलन सुरु करा. पोलिसांनी परवानगी दिली नाही दिली तरी आंदोलन करा. पण यावेळी जाळपोळ करू नका. शहरातील नागरिकांनी शहरात आणि गावातील लोकांनी सकाळी 10.30 ते 1 आणि ज्यांना जमलं नाही त्यांनी संध्याकाळी 4 ते 7 पर्यत आंदोलन करा. रोज आंदोलन करा. पण कुणाचीही गाडी फोडू नका. जाळू नका, पण पुढे जाऊ देऊ नका. आंदोलनाचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ देऊ नका,” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. जगातला सर्वात मोठा रस्ता रोको झाला पाहिजे, गिनीज बुकने यांची नोंद घेतली पाहिजे असं आंदोलन करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
“पोलिसांनी आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलं तर अख्ख्या गावाने पोलीस ठाण्यात जाऊन बसू. आमदार, खासदार, मंत्री यांनी आता आमच्या दारासमोर यायचं नाही. दारासमोरची जागा आमची आहे. यांच्या दारातदेखील कुणी जायचं नाही. दारात यायचं नाही याचा अर्थ त्याने ठरवायचा आहे. निवडणुका मराठा आरक्षण मिळेपर्यंत घेऊ नये. आम्हाला आदर्श आचारसंहितेचा सन्मान राखता यायला पाहिजे,” असंही त्यांनी सांगितलं
Discussion about this post