मुंबई । जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील आजपासून (१० फेब्रुवारी) आमरण उपोषणाला बसणार असून यामुळे राज्य सरकारचं टेन्शन पुन्हा वाढणार आहे.
राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी जरांगे यांनी केली होती. यासाठी त्यांनी सरकारला ९ फेब्रुवारीपर्यंतची डेडलाईन दिली होती. मात्र, सरकारकडून अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नसल्याने मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मुंबईत मराठा आंदोलक धडकण्याआधीच राज्य सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे जाहीर केले होते.
सगेसोयऱ्यांचा अध्यादेश निघाल्यानंतर जरांगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र, सरकारने जरांगे यांच्यासह मराठा समाजाची फसवणूक केल्याची टीका सोशल मीडियामधून होत आहे. या टीकेवरही जरांगे यांनी संताप व्यक्त केला असून टीकाकारांना थेट इशाराच दिला आहे. माझ्याविरोधात काहींनी सुपारी घेतलीय, यापुढे ते शांत न बसल्यास त्यांच्या पक्षासह त्यांच्या नेत्यांची नावं उघड करणार असल्याचा थेट इशारा जरांगेंनी दिला आहे. यासोबतच १० फेब्रुवारीपासून आपण कठोर आमरण उपोषण करणार, असंही जरांगे यांनी माध्यमांसमोर सांगितलं आहे.
Discussion about this post