राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्याने विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. अशातच आज सकाळी माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेतली. याबाबत स्पष्टीकरण देत असताना त्यांनी सरकारलाच भिकारी म्हटले आहे. माणिकराव कोकाटेंच्या या वादग्रस्त विधानाची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे.
खरंतर काही महिन्यांपूर्वी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी हल्ली भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही. पण, आम्ही शेतकऱ्यांना एका रुपयामध्ये पिक विमा दिला. काही लोकांनी त्याचा गैरवापर केला, असे वक्तव्य केले होते. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यातच विधानभवनात मोबाईलमध्ये रमी खेळत असतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनामाची मागणी करण्यात आली होती. आता माणिकराव कोकाटे यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना ‘शासन भिकारी आहे, शेतकरी नाही’, असे वक्तव्य केले आहे. यावरून माणिकराव कोकाटे हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.
तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता माणिकराव कोकाटे यांचे कान टोचले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते काय बोलले हे मी ऐकलेले नाही. मला असे वाटते की, जर त्यांनी असे वक्तव्य केले असेल तर मंत्र्यांनी असे वक्तव्य करणे, अतिशय चुकीचे आहे, असे म्हणत त्यांनी माणिकराव कोकाटे यांचे कान टोचले आहेत.
Discussion about this post