धुळे : ग्रामविकास अधिकारी मनमानी कारभार करत असून या कारभाराला कंटाळून धुळ्याच्या मांडळ ग्रामपंचायत कार्यालयाला कुलुप ठोकून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे
सरपंच, उपसरपंच तसेच पंचायत समिती सदस्य व ग्रामस्थांनी वेळेवर कामे होत नसल्याने ग्रामविकास अधिकारी मुकेश बेलदार यांच्या विरोधात घोषणाबाजी करून मांडळ ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले आहे. तसेच नवीन ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती होईपर्यंत कार्यालय उघडण्यात येणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यामुळे प्रशासन आता काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
धुळे तालुक्यातील मांडळ ग्रामपंचायत ही शहरालगत लागून असल्याने काही ना काही कामानिमित्त ग्रामस्थांची सतत वर्दळ असते. मात्र दोन महिन्यांपूर्वीच मांडळ ग्रामपंचायतीला नियुक्त झालेले ग्रामविकास अधिकारी हे मनमानी पद्धतीने कामकाज करत आहेत. सतत कार्यालयात गैरहजर राहत असल्याचे गावातील नागरिकांचे कामे देखील रखडलेली आहे. कामांसाठी फेऱ्या माराव्या लागत असून देखील कामे होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे.















Discussion about this post