सिंधुदुर्गातील मालवण परिसरात असलेल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या दुर्घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर आता विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली जात आहे. त्यातच आता राजकोट किल्ल्यावर भाजप विरुद्ध महाविकासआघाडीचे कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला आहे.
यादरम्यान ठाकरे आणि राणे यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. पोलिसांकडून यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आज मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकासाघाडीचे नेत्यांनी आज पाहणी केली. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत हे राजकोट किल्ल्यावर आले.
यावेळी आदित्य ठाकरे आले असताना नारायण राणे हे त्यांचा मुलगा निलेश राणेंसह राजकोट किल्ल्यावर दाखल झाले आहेत. यावेळी पोलिसांनी राणे आणि त्याच्या कार्यकर्त्यांना राजकोट किल्ल्याच्या पायथ्याशीच थांबवलं. यानंतर राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी भाजप नेते निलेश राणे यांनी पोलिसांनी सक्त ताकीद दिली. आम्ही आमचा वेळ पोलिसांना दिला होता. त्यानंतरही हे कसं काय घडलं? हे बाहेरुन येऊन अंगावर येत आहेत. हे बाहेरुन येऊन अंगावर येणार का? त्यांना गपचूप निघायला सांगा. आमच्या एकाही कार्यकर्त्याला हात लावायचा नाही. पोलिसांनी आमच्या कार्यकर्त्यांना हात लावायचा नाही, असे निलेश राणे म्हणाले.
यानंतर गडावरच दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले आहे. तर आदित्य ठाकरे कार्यकर्त्यांना घोषणाबाजी थांबावण्याचं आवाहन केलं. राणे समर्थकांनी मात्र आक्रमक भूमिका घेतली आहे. यादरम्यान, आदित्य ठाकरे यांनी ठिय्या आंदोलन केलं आहे. यावेळी जयंत पाटील यांनी देखील मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्याची पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, तेव्हा ते म्हणाले की, “माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत. पुतळ्यात भाजपवाले चोरी, भ्रष्टाचार करु शकतात हे आमच्या आकलनाच्या बाहेर आहे, तरी त्यांनी करुन दाखवलं आहे. पंतप्रधानांना खूश करायचं, त्यांच्याकडून कार्यक्रम करुन घ्यायचा यासाठी हे झालं आहे. काल एक निर्लज्ज मंत्री येथे आले आणि यातून चांगलं काहीतरी करु असं म्हणाले. याचा अर्थ याच्यातून अजून पैसे कमवायचे आहेत. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी यापेक्षा जास्त वारे सहन करतो. मग तुमच्या मनात महाराजांबद्दल द्वेष का?” अशी विचारणा आदित्य ठाकरेंनी केली आहे.















Discussion about this post