मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी येत्या २७ मार्चला पोटनिवडणूक होणार आहे. या जागांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान महायुतीकडून या जागांसाठी कोणाला संधी मिळणार? याकडे लक्ष लागले होते. अशातच या निवडणुकीसाठी महायुतीकडून ५ जागांसाठी उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे.
विधानपरिषदेषच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपला ३, शिवसेना शिंदे गटाला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक जागा देण्यात आली आहे. रविवारी भाजपकडून विधानसभेच्या या रिक्त जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली. भाजपने संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी यांना उमेदवारी दिली. त्यानंतर आज शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
शिवसेना शिंदे गटाकडून आज उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले. शिवसेना शिंदे गटाकडून संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. संजय खोडके हे अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्यामुळे त्यांना संधी देण्यात आली आहे.
Discussion about this post