अकोला : आगामी लोकसभा जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची बैठक पार पडली असून यात जवळपास 40 जागांवर सर्वपक्षीयांचं एकमत झालं आहे, तर उर्वरित 8 जागांचा तिढा अद्याप कायम आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटासह वंचित बहुजन आघाडी आणि राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष महाविकास आघाडीत आहे. मात्र वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत समावेश झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आज आपली भूमिका मांडली असून त्यांच्या वक्तव्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत.
प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
जागावाटपाच्या चर्चेबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले, “कालच्या बैठकीत मविआचंच काही ठरलं नसल्याचं लक्षात आलं. त्यांचं ठरावं म्हणून आम्ही आमचे काही मुद्दे समोर ठेवलेत. किमान समान कार्यक्रम, मराठा आणि ओबीसी आरक्षण, दिल्लीतील शेतकरी आंदोलन असे 15 मुद्दे आम्ही कालच्या बैठकीत मांडले.
कालच्या बैठकीत जागा वाटपावर काय ठरलं याची माहिती मागितली. 2 तारखेच्या बैठकीपर्यंत जागा वाटपाचा फॉर्मुला स्पष्ट करण्याचा आग्रह केला. आम्ही आमचा इगो आड येऊ देणार नाही. वंचित बहुजन आघाडीचा अद्याप महाविकास आघाडीमध्ये समावेश झालेला नाही. जे पत्र आम्हाला दिलं आहे त्या पत्रावर फक्त काँग्रेसच्या नाना पटोले यांची सही आहे, त्यावर बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांची सही नाही. असं प्रकाश आंबेडकर म्हणाले
कालच्या पत्रावरील नाना पटोलेंच्या सहीला आम्ही महत्व देत नाही. ती पटोलेंची वैयक्तिक सही. शरद पवार, उद्धव ठाकरेंचा आम्हाला महाविकास आघाडीत घ्यायचा निर्णय. मात्र काँग्रेसचा अद्याप निर्णय नाही असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.
Discussion about this post