मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने बैठकीचा धडका लावला असून निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी रणनीती देखील आखण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी जागावाटपाचा फॉर्म्युला देखील ठरवला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. या जागांचे वाटप करण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी फॉर्म्युला ठरवला आहे
महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागांचं वाटप करण्यासाठीचा फॉर्म्युला दिल्लीत ठरला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या फॉर्म्युल्यानुसार, काँग्रेसला २१ ते २२ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला १७ ते १८ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाला ६ जागा आणि वंचित बहुजन आघाडी २ जागा, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ जागा मिळणार, असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झाला नसून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात वाटाघाटीची सुरुवात २२ ते २३ जागांपासून होऊ शकते. चर्चेअंती दोन्ही पक्ष किमान तीन जागांवर पाणी सोडण्यासही तयार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
Discussion about this post