मुंबई । नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. अशातच लोकसभा निवडणूक एकत्र लढवून राज्यात चांगली कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीने आता विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चाचपणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीला अजून चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस १०० ते १०५ जागा लढवणार असल्याची माहिती आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्षाने ९० ते ९५ जागांवर उमेदवार देण्याची तयारी केली आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ८० ते ८५ जागा लढवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
विधानसभा निवडणुकीला अजून ४ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, त्यापूर्वी निवडणुकीच्या तयारीला योग्य वेळ मिळावा म्हणून महाविकास आघाडीने जागावाटपाबाबत बोलणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर शनिवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती.
या पत्रकार परिषदेपूर्वी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जागावाटपाची प्राथामिक बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. तिन्ही पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागांव्यतिरिक्त कोणत्या जागांवर कोणत्या पक्षाची ताकद आहे, याची चाचपणी करण्यात येऊन उमेदवाराबाबत निर्णय घेतला जाईल, असं बैठकीत स्पष्ट करण्यात आलं.
Discussion about this post