मुंबई । राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरती रिक्त पदांच्या भरतीस सकारात्मक प्रतिसाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आला. तसेच अभियांत्रिकी शासन अनुदानित संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीसही अनुकूलता दाखवण्यात आली आहे.
राज्यात 5500 प्राध्यापक आणि 2900 कर्मचाऱ्यांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ, उच्च शिक्षण संवर्ग महाराष्ट्र प्रदेश आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘विकसित महाराष्ट्र 2047’ जाणीव जागृती कार्यशाळेत मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं, 2029 पर्यंत राज्यातील सर्व विद्यापीठांनी आपला दर्जा सुधारावा लागेल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जागतिक क्रमवारीत स्थान उंचावले आहे आणि येत्या पाच वर्षांत जगातील आघाडीच्या 500 विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
राज्यात विद्यापीठांची संख्या कमी असल्यामुळे त्यावरचा भार वाढला आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सहकार्यवाह डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांनी प्रत्येक जिल्ह्यात एक विद्यापीठ आणि संशोधन केंद्र सुरू करण्याची गरज व्यक्त केली. दर्जा सुधारण्यासाठी प्रशिक्षित शिक्षक आणि पायाभूत सुविधांची वाढ आवश्यक आहे, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, राज्यात तंत्रज्ञान विद्यापीठांची संख्या कमी असून, ही विद्यापीठे पूर्ण क्षमतेने सुरू ठेवणे गरजेचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक संधी प्राप्त होतील व गुणवत्ता वाढेल. लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठात 105 अध्यापकीय पदे, एक शिक्षक समकक्ष पदांस मंजुरी देण्यात यावी असे निर्देश दिले. याचबरोबर इतर विद्यापीठाप्रमाणे तंत्रज्ञान विद्यापीठात आठ कोटी रूपये दैनंदिन व प्रशासकीय खर्च भागविण्यासाठी प्रदान करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. तसेच 788 अध्यापकीय पदे, 2242 इतकी शिक्षकेतर पदे भरण्यात मान्यता देण्यात आली आहे. उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील रिक्त सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील 5012 पदांच्या भरतीस मान्यता देण्यात आली आहे. तसेच व्ही.जे.टी.आय आणि श्री. गुरूगोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड यांसह राज्यातील इतर शासन अनुदानित संस्थांमध्ये 100 टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठास एकूण 603 पदांचा सुधारित आकृतीबंधही मंजूर करण्यात आला.
Discussion about this post