पुणे । राज्यातील तापमानात सातत्याने बदल होत असल्याचे पाहायला मिळाले. राज्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. आर्द्रतेत प्रचंड वाढ झाल्याने उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले. यातच राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने आजही मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे आणि विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे.
मराठवाड्यापासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्याच्या विविध भागात ढगाळ हवामान होत असून, गेले काही दिवस राज्याच्या विविध भागात पाऊस हजेरी लावत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज उष्णता वाढण्याची शक्यता आहे. तर, बीड, धाराशीव, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी.
महाराष्ट्रात शनिवारी नोंदवलेले तापमान
महाराष्ट्रात शनिवारी (२७ एप्रिल २०२४) चंद्रपूर (४३.६) येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तर, पुणे (४०.३ सेल्सिअस), धुळे (४१.५ सेल्सिअस), जळगाव (४०.६ सेल्सिअस), कोल्हापूर (३८.५ सेल्सिअस), महाबळेश्वर (३२.५ सेल्सिअस), मालेगाव (४१.० सेल्सिअस), नाशिक (३७.६ सेल्सिअस), निफाड (३७.६ सेल्सिअस), सांगली (३९.६ सेल्सिअस), सातारा (३८.२ सेल्सिअस), सोलापूर (४१.२ सेल्सिअस), सांताक्रूझ (३५.५ सेल्सिअस), डहाणू (३३.९ सेल्सिअस), रत्नागिरी (३३.२ सेल्सअस) छत्रपती संभाजीनगर (३९.६ सेल्सिअस), बीड (४१.८ सेल्सिअस), नांदेड (४१.२ सेल्सिअस), परभणी (४२.२ सेल्सिअस), अकोला (४१.९ सेल्सिअस), अमरावती (४०.४ सेल्सिअस), बुलढाणा (४०.५ सेल्सिअस), ब्रह्मपूरी (४२.७ सेल्सिअस), गडचिरोली (४१.० सेल्सिअस), गोंदिया (३५.४ सेल्सिअस), नागपूर (३७.० सेल्सिअस), वर्धा (४२.५ सेल्सिअस), वाशीम (४२.४ सेल्सिअस) आणि यवतमाळ येथे ४१.२ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Discussion about this post