मुंबई । राजकीय वर्तुळासह अख्ख्या महाराष्ट्राचं, किंबहुना देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची बहुप्रतीक्षित घोषणा आजच होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग दिल्लीतून पत्रकार परिषद घेत दुपारी साडेतीन वाजता महाराष्ट्रासोबतच झारखंड विधानसभा निवडणुकांचीही घोषणा करेल.या पत्रकार परिषदमध्ये निवडणूक किती टप्प्यात होणार आणि कोणती तयारी सुरू आहे हे निवडणूक आयोग सांगेल
याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये जागावाटपावरुन खलबंत सुरु आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून विधानसभेचा कार्यकाळ २८ नोव्हेंबर रोजी संपणार आहे.निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होईल. मागील दोन दिवसांपासून राज्यात एकामागून एक राज्यमंत्रिमंडळाच्या बैठका, निर्णयांचा सपाटा सुरु होता. तसेच रविवारच्या दिवशीही मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या लगबग होती.
दरम्यान, महाराष्ट्रात निवडणूक जाहीर झाल्यानंतर २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी नोव्हेंबर महिन्यातील मध्यल्या आठवड्यात मतदान घेतलं जाईल, असंही सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या घोषणेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.