नाशिक शहरातील तत्कालीन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई । विधीमंडळ अधिवेशनाचा आज आठवा दिवस आहे. यादरम्यान, नाशिक जिल्ह्यातील गंगापूर पोलिस ठाण्याचे तत्कालिन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईणकर यांची सहपोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत एक महिन्याच्या आत चौकशी केली जाईल आणि तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. तसेच सरकारी कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याप्रकरणी असलेल्या कलम ३५३ (अ) तरतुदीचा दुरुपयोग होत असल्यास पुढील तीन महिन्यांत यामध्ये सुधारणा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
सदस्य सुहास कांदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उत्तर दिले.
ते म्हणाले की, सरकारी कर्मचारी यांच्यावर सातत्याने होणारे हल्ले लक्षात घेऊन ही तरतूद सन २०१७ मध्ये करण्यात आली होती. त्यांनाही कामकाज करताना संरक्षण असावे आणि या तरतुदीचा गैरफायदाही घेतला जाऊ नये, ही राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे यामध्ये निश्चितपणे सुधारणा केली जाईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, नाशिक शहरातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येईल. संबंधित पोलीस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची चौकशी करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य यशोमती ठाकूर, भास्कर जाधव, आशिष जयस्वाल, देवयानी फरांदे आदींनी सहभाग घेतला.
——————–
अमरावतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील सौंदर्यीकरणासंदर्भात लवकरच निर्णय घेणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अमरावती शहरातील इर्विन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगतची जमीन पुतळा परिसर सौंदर्यीकरणासाठी संपादित करण्याची प्रक्रिया लवकरच करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य बळवंत वानखडे, सुलभा खोडके यांनी मांडली होती.
मंत्री श्री. विखे -पाटील म्हणाले की, अमरावती महानगरपालिका हद्दीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सौंदर्यीकरणाच्या प्रयोजनाकरिता इर्विन चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराजवळ असलेली जमीन संपादनाकरिता आयुक्त अमरावती महानगरपालिका यांनी सन २०१५ मध्ये प्रस्ताव सादर केला आहे. परंतु संबंधित भूधारकांनी मा. उच्च न्यायालयात याबाबत रिट याचिका दाखल केली असल्याने हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. याबाबत विधी व न्याय विभाग आणि संबंधित विभागांचा अभिप्राय घेऊन ही जागा सौंदर्यीकरणासाठी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
—————
खंडकरी शेतकरी वाटप जमिनीचा भोगवटा वर्ग १ करण्याच्या प्रस्तावावर लवकरच धोरणात्मक निर्णय – महसूल मंत्री विखे पाटील
खंडकरी शेतकरी यांना वाटप करण्यात आलेल्या क्षेत्राचा दर्जा भोगवटा वर्ग २ असा निश्चित करण्यात आला आहे. अशा जमिनींचा भोगवटा वर्ग – २ वरून भोगवटा वर्ग – १ करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
राज्यातील पुणे, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद या सात जिल्ह्यांमधील महाराष्ट्र शेती महामंडळ कामगारांच्या अडचणी संदर्भात विधानसभा सदस्य दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, शेती महामंडळाच्या 14 मळ्यांवरील कामगारांना पायाभूत सुविधा, त्यांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे, म्हणून शेती महामंडळाकडे शिल्लक असलेल्या जमिनीपैकी घरकुलसाठी काही जागा देण्यात यावी अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. या सर्व कामगार बांधवांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे, यासाठी शासन सकारात्मक असून याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.