जळगाव । गेल्या काही आठवड्यांपासून राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या अवकाळी पावसाने अखेर काहीशी माघार घेतली असून आता हवामानात हळूहळू स्थिरता येऊ लागली आहे. आज ८ एप्रिलपासून राज्यातील बहुतांश भागांत कोरडे आणि उन्हाळी वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र तापमानात झपाट्याने वाढ होत असल्याने उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अवकाळी पावसाचा प्रभाव कमी झाला असला तरी पुढील ४८ तास हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत. काही भागांत हलक्या पावसाची शक्यता कायम असली तरी एकूणच वातावरण कोरडे राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात वाढ होण्याची शक्यता असून दमट वातावरणामुळे उकाडा जाणवू शकतो. पुणे, सोलापूर आणि आसपासच्या भागांत तापमान ३२ ते ३८ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातही उन्हाचा तडाखा वाढणार असून कमाल तापमान ३८ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
मराठवाडा आणि विदर्भातही हवामान हळूहळू स्थिर होत असले तरी तापमान ३६ ते ४१ अंशांपर्यंत वाढू शकते. त्यामुळे उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळणे आणि सावलीत राहणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.















Discussion about this post