मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यात उन्हाचा प्रकोप पाहायला मिळत असून असह्य होणाऱ्या उकाड्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले. उकाड्यापासून हैराण झालेले नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहात असून अशातच आता एक दिलासादायक बातमी हवामान खात्याने दिली आहे. पुढील 2 दिवसांत राज्यात कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात मोठी वाढ होण्यास सुरुवात झाली. या उकाड्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले असून दुपारच्या वेळी अनेक जिल्ह्यांमध्ये रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. देशातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात 4 ते 6 अंशांची घट पुढील पाच दिवसांत होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
त्यातच राज्यातील काही ठिकाणी पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा आणि तुरळक भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई आणि परिसरात पुढील पाच दिवसांत कमाल तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. दोन ते तीन अंशानी ही घट होईल. तर शुक्रवारी तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील इतर भागातही तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, राज्यात शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकही मान्सूनचीआतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुढील दोन दिवसात मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात दोन दिवसांत म्हणजेच 27 मेपर्यंत मान्सूनपूर्व पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहे. यामुळे राज्यात सात जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
Discussion about this post