आज सकाळी सुमारे ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. वाशिम, यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांतील काही भागात जमीन हलल्यासारखे जाणवल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम शहर आणि परिसरात सकाळी ८:४५ वाजता हलका धक्का जाणवला. त्याचवेळी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेबाळपिंपरी परिसरातही नागरिकांनी जमिनीत कंप जाणवल्याचे सांगितले. नांदेड शहर व आसपासच्या भागात ८:४६ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याची माहिती समोर आली आहे.
भूकंपाच्या वेळी काही नागरिकांनी भूगर्भातून आवाज आल्याचे आणि घरातील वस्तू हलल्यासारखे वाटल्याचे सांगितले. त्यामुळे अनेकजण घाबरून काही काळ घराबाहेर पडले होते. मात्र, काही मिनिटांत परिस्थिती पूर्ववत झाली.
सुदैवाने या घटनेत कुठेही जीवित किंवा वित्तीय नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS) कडून भूकंपाची तीव्रता (मॅग्निट्यूड) आणि केंद्रबिंदू याबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.














Discussion about this post