पुणे । महाराष्ट्र राज्य मंडळाने शैक्षणिक वर्षासाठी एकसमान दिनदर्शिका लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वेगवेगळ्या विभागांमध्ये वेगवेगळ्या तारखांना परीक्षा होण्याऐवजी आता सर्वत्र एकाच वेळेला होणार आहेत.
राज्यातील सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी. विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग व्हावा, यासाठी एकच वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. याबाबतचे परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. पहिली ते नववीच्या वार्षिक परीक्षा ८ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान होणार असून, १ मे रोजी निकाल जाहीर केला जाईल. त्यानंतर २ मेपासून उन्हाळी सुट्टी सुरू होईल.
राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीच्या परीक्षा मार्चअखेरीस अथवा एप्रिल महिन्यापर्यंत होत असतात. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यास त्यानंतरच्या कालावधीत शाळा सुरू होतात. पण विद्यार्थ्यांची उपस्थिती पुरेशी नसते. परीक्षांचे आयोजन वर्षअखेर करण्याऐवजी लवकर केल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मिळणारा कालावधी कमी होत असतो. प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येत असते. त्यामुळे सर्व शाळांच्या वार्षिक परीक्षा या एकाच वेळी घेण्यात याव्यात, अशा सूचना शिक्षण उपसंचालक (प्रशासन) रजनी रावडे यांनी दिल्या आहेत.
Discussion about this post