मुंबई । पावसाची आस धरून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत असून या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरूवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहेत. यामुळे पुढील ५ ते ७ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
गेल्या महिनाभरापासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांकडे पावसाने पाठ फिरवली आहे. पाण्याअभावी खरीप हंगामातील पिके करपून चालली असून बळीराजा संकटात सापडला आहे. दुबार पेरणी करून सुद्धा पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलंय.अशातच हवामान खात्याने येत्या २ ते ३ दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवली आहे. पुणे घाट विभागात दोन दिवस यलो अलर्ट असून मुसळधार पाऊस असणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मान्सून परतणार, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
सप्टेंबर महिन्या सुरू झाला, तरी देखील मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अद्यापही मुसळधार पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अशातच दिलासादायक पाऊस कधी पडेल, याची सर्वजण आस धरून बसले आहेत. आता हवामान खात्याने पुढील ३ दिवस मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
आज म्हणजेच ६ सप्टेंबर ते ९ सप्टेंबरच्या कालावधीत मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात हलका, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक ८ ते १४ सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाला थोडासत्र दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासोबत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
Discussion about this post