मुंबई । गेल्या आठवड्यात धुमाकूळ घातलेल्या पावसाने मागील चार पाच दिवसापासून विश्रांती घेतली असली तरी आता राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, आज कोकणात विशेषत: रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
मुंबईतही हलक्या पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आज विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी पडू शकतात, असे संकेत मिळाले आहेत.
विदर्भात मात्र हवामान तुलनेने स्थिर असून, अंशतः ढगाळ वातावरणासोबत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, मध्य प्रदेश व त्याच्या शेजारील भागावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, ते वायव्येकडे सरकत आहे. या प्रणालीमुळे महाराष्ट्राच्या विविध भागात ढगाळ हवामान निर्माण झाले आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर, जयपूर, ग्वालियर, प्रयागराज, कमी दाबाचे केंद्र आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला आहे. यामुळे राज्यात वातावरण अस्थिर बनले असून, ढगांचा उच्छाद कायम आहे. हवामान विभागाने बंगालच्या उपसागरात उद्यापर्यंत म्हणजेच २६ ऑगस्ट रोजी नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तविली आहे. याचा सरळ परिणाम पुन्हा महाराष्ट्रातील मान्सूनच्या सक्रियतेवर होऊ शकतो.















Discussion about this post