मुंबई । गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचं दमदार पुनरागमन झालंय. राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. दरम्यान हवामान विभागाने, राज्यात पुढील २४ तासांसाठी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. महाराष्ट्रासाठी पुढील २४ तासात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू असून आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईत सध्या अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे उन्हाने दडी मारली असून सध्या आकाशात काळे ढग दाटून आले आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकण किनारपट्टी परिसरात ऑरेंड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सातारा, कोल्हापूरसह घाटमाथा परिसरासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन पथकेही सज्ज ठेवण्यात आली आहेत.
उंचच उंच लाटा उसळण्याची शक्यता
भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणी उंचच उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर आणि उपनगर परिसरात आज सायंकाळी ५.३० वाजल्यापासून ते उद्या (२४ जुलै) रात्री ८.३० वाजेपर्यंत ३.६ ते ४.३ मीटर उंच लाटा येण्याची शक्यता आहे. तसेच पालघर आणि रायगड या जिल्ह्यात उद्या २४ जुलैपर्यंत ३.४ ते ३.८ मीटर उंच लाटा उसळतील, असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे लहान बोटी आणि होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना राज्य आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राकडून देण्यात आल्या आहेत.
Discussion about this post