मुंबई/जळगाव । महाराष्ट्रात सध्या हवामानाचा अजब खेळ सुरू असून, एकाच वेळी पाऊस आणि प्रचंड उष्णतेचा अनुभव नागरिक घेत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज पूर्व विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असल्याने ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, लांजा आणि राजापूर भागात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे काही घरांचे नुकसानही झाले आहे. दुसरीकडे, विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांनाही वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्याच्या इतर भागांत उन्हाचा तडाखा कायम आहे. अकोला आणि अमरावती येथे तापमानाने ४१ अंशांचा टप्पा पार केला असून, परभणी, वर्धा आणि यवतमाळमध्येही तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. जळगाव, सोलापूर, चंद्रपूर आणि वाशीममध्येही उष्णतेची तीव्रता जाणवत आहे.
जळगाव जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा इशारा
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या पुढील अंदाजानुसार, पुढील आठवड्यात जिल्ह्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो. ३० मार्च ते २ एप्रिल या काळात येलो अर्लट दिला असून ढगाळ वातावरण कायम राहणार असून, जिल्ह्यात पावसाची हजेरी लागणार आहे.















Discussion about this post