मुंबई । तब्बल महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर राज्यात पाऊस परतला आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात आता कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा हळू हळू वायव्येकडे सरकत आहे. यामुळे राज्यात कृष्ण जन्माष्टमीला मॉन्सून सक्रिय झाला आहे. राज्याच्या काही भागामध्ये मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.
राज्यातील नंदुरबार, वाशिम, परभणी, अमरावती, भंडारा या जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आज विदर्भातील काही भागात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यातही आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुण्यासह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांनाही आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. या पावसामुळे अनेक भागात उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. संपूर्ण राज्यात गुरुवारी आणि शुक्रवारी बहुतांश ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं असून हे क्षेत्र पश्चिम आणि उत्तर-पश्चिमेकडे सरकण्याची चिन्हे दिसत असल्याने पाऊस पुन्हा सक्रीय होत आहे.
Discussion about this post