पुणे । गेल्या तीन ते चार दिवसांपासून देशासह महाराष्ट्रात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. राज्यातील काही भागात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच शेतकऱ्यांची आणखी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. महाराष्ट्र पुढील ४८ तासांत ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना गारपीटीचा तडाखा बसू शकतो, असा अंदाजही वर्तवण्यात आलाय. शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिके झाकून ठेवावी, असा सल्लाही भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
राज्यात कुठे-कुठे कोसळणार पाऊस?
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरणसहित अवकाळी पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. याशिवाय कोकणातील काही जिल्ह्यांतही अवकाळी पाऊस होऊ शकतो. असं भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
Discussion about this post